आंस

थबकते पाऊल माझे ऐकुनि चाहूल त्याची
एक आशा घेऊनि मी चालतेची वाट आहे
ही प्रतिक्षा संपवेना ना सरे हुरहूर ही
ध्यास त्याचा साहवेना कां मनीं काहूर आहे
मोकळ्या या माळरानी श्वापदांचे मुक्त मेळे
हरवल्या वाटा वनी या अन जीवाला घोर आहे
दूर क्षितिजाशी धरेचा भास होई मीलनाचा
स्पर्श त्याचा जाणवेना गंधही आभास आहे
संपवू व्याकूळता ही संपवावी अधीरता
भास त्याचा सहप्रवासी साहते उद्वेग आहे
ना दिसे डोळा तरीही जाणवे अस्तित्व हे
थबकल्या ह्या पावलांना मग कुणाची आंस आहे
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना
- हे पान ईमेलने पाठवा