मागू लागले ..

आरसे भलतेच मागू लागले
आमुचे चेहरेच मागू लागले!
बोललो इतकेच मी, "का मारता?"
ढाल छळणारेच मागू लागले!
ना कुणी काट्यांस वाली राहिला,
फुल देव्हारेच मागू लागले!
मागणार्यांना जरा सौजन्य नाही,
दान प्राणांचेच मागू लागले!
काल जे गेले दिलासे देऊनी
मोल त्यांचे तेच मागू लागले!
जे कधी जगलेच नाही मोकळे,
प्रेमही हलकेच मागू लागले!
काय मी झोळी धरू त्याच्यापुढे?
भीकही सगळेच मागू लागले!
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना
- हे पान ईमेलने पाठवा
मिलन, आशय
मिलन,
आशय नेहमीप्रमाणेच चांगला आहे. मात्र गझलेत मात्रादोष असू नयेत.
आरसे भलतेच मागू लागले
आमुचे चेहरेच मागू लागले! (चेहरेच या शब्दात एक मात्रा जास्त आहे.)
बोललो इतकेच मी, "का मारता?"
ढाल छळणारेच मागू लागले!
ना कुणी काट्यांस वाली राहिला,
फुल देव्हारेच मागू लागले! (फुल हा शब्द फूल असा यायला हवा आहे.)
मागणार्यांना जरा सौजन्य नाही,(नाही या शब्दामुळे दोन मात्रा जास्त येत आहेत. 'ना' असेही चालते.)
दान प्राणांचेच मागू लागले!
काल जे गेले दिलासे देऊनी (उ पहिला यायला हवा, दीर्घ नाही.)
मोल त्यांचे तेच मागू लागले! (व्वा! मस्तच शेर)
जे कधी जगलेच नाही मोकळे, (सुंदर मिसरा!)
प्रेमही हलकेच मागू लागले!
काय मी झोळी धरू त्याच्यापुढे?
भीकही सगळेच मागू लागले!
अनेक शेर छान आहेत. मात्रादोष मात्र जायला हवेत.
चु,भु.द्या.घ्या.
बरोबर
धन्यवाद. 'फूल' मध्ये चूकच झाली. आणि मात्रादेखील काळजीपुर्वकच पहायला हव्या होत्या. मार्गदर्शनाबद्दल आभार. मी मागे विचारले होते, प्रसिध्द झाल्यावर त्यातले दोष काढता येतात का? तशी सोय आहे का?