एक रक्त हिरवे दुसरे भगवे निघाले

विधेयकात सारे रुसवे फुगवे निघाले ।
एका कडेत डावे दूस-या उजवे निघाले॥
रस्त्यात सांडले तरीही दोन पाट निघाले
एक रक्त हिरवे दूसरे भगवे निघाले॥
लकाकते लुचपतींची हप्तेवार वसूली
माझे खिसे फाटके इमान फसवे निघाले॥
जर्तारी योजनांच्या झाल्या घोषणा सरकारी
हरती ससे शर्यती पुढे कासवे निघाले।
अरे थडग्यांच्या वस्तीने शेवटी कौल दिला
पोटा साठी पाखरांचे दूर हे थवे निघाले॥
मी काय बरे अता देवू तुला माझ्या सुखा
दाटून उसासे गळी आसवासवे निघाले।
गालावरी क्षणेक थांबले थेंब पापणीचे
ते नजर निरोपाची घेत पारवे निघाले।
मिटल्या जरी पापण्या तेव्हा प्रतिक्षेत तुझ्या
कोंब थिजल्या डोळ्यात माझ्या हिरवे निघाले॥
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना
- हे पान ईमेलने पाठवा
खरंच गझल आहे?
मराठी गझल वर प्रकाशित होणा-या एकाहुन एक लाजवाब गझला वाचल्यावर, गझल लिहाविसी वाटली, पण लिहीलेल्या ह्या ओळी खरचं गझलेच्या आकृतीबंधात बसतात का ते अजून ही समजले नाही. जाणकारांनी व वाचक रसीकांनी कृपया कळविल्यास बरे होईल.
आशय
अनपार्लमेंटरी भाषा गझलेत येऊ नये असे माझे वैयक्तीक मत आहे. मात्र मी आपला मते ठोकत असतो.
आपली ही खालील ओळ वाचून तीव्र नवल वाटले.
कोण हे गटागटातून **** निघाले?
बाकी रदीफ व काफिया पाळलेले आहेत. रचना व्रुत्तात नाही. लयीत म्हणता येत नाही.
आपल्याला नाउनेद वगैरे करण्याचा मला अधिकारही नाही व क्षमताही नाही. मात्र मला तरी ही रचना गझल वाटत नाही. ही एक सामाजिक कविता वाटली.
चु.भु.द्या.घ्या.
'बेफिकीर'!
एखादी गझल वृत्तात नाही...
इथे खरचं '*****' हा शब्द नको पण एखादी गझल वृत्तात नाही म्हणून ती गझल होत नाही का ?
असे म्हणण्याचा मला अधिकार नाही
मात्र ती गझल होत नाही हे वर्षानुवर्षे गझल करणार्यांचे म्हणणे आहे.
मी ते म्हणणे अनुसरतो.
धन्यवाद!
तंत्र महत्वाचे की भावना महत्वाची ?
तंत्र महत्वाचे की भावना महत्वाची यावर मागे फार मोठी चर्चा झाली होती.
भावना...
भावना महत्वाची ह्यात काही शंका नसावी. ती व्यक्त करण्यासाठी कुठले माध्यम निवडायचे (चित्र, चित्रपट, कथा, कादंबरी, कविता इ.) हा ज्याच्या-त्याच्या आवडीचा आणि कुवतीचा प्रश्न. मग तुम्ही भावना व्यक्त करायला जर 'गझल' हे माध्यम निवडले असेल तर त्यासोबत असलेल्या सर्व तांत्रिक बाजू सांभाळल्याच पाहिजेत.
- नचिकेत आठवले
संपादित
बाराखडीत लिहिल्याप्रमाणे...
"गझलेची भाषा तिच्या पिंडाला मानवणारी असावी. ज्याचा आपल्या मातृभाषेवर संपूर्ण ताबा आहे. त्याला कोणताही विषय किंवा कोणतीही भावना शिवीगाळ न करता तेवढ्याच प्रभावीपणे शेरातून व्यक्त करता येते. क्वचित प्रसंगी अगदी अपरिहार्य झाल्यास एखादा असा शब्द त्या शेराच्या अभिव्यक्तीत चपखलपणे बसत असल्यास उपयोगात आणायला हरकत नाही. पण तसा शब्द अपरिहार्य असावा."
ह्या रचनेत वापरलेला शब्द अपरिहार्य वाटत नाही. त्या ऐवजी पर्यायी शब्द सहज वापरता येईल. त्यामुळे तो शेर व प्रतिसादात आलेल्या त्या शब्दाचा उल्लेख संपादित केला आहे.
~ प्रशासक
धन्यवाद
गझलेच्या संकेत स्थळावर माझ्यासारख्याची कविता ठेवू दिल्याबद्दल व त्याला मिळालेल्या 127 वाचने व 7 महत्वपूर्ण प्रतिसादाबद्दल मी आपल्या सर्वांचा मन:पूर्वक आभारी आहे. एवढा भरभरुन प्रतिसाद कदाचित 'त्या' शब्दामुळे असेल ही, परंतु त्या निमित्त का असेना, कविता वाचल्या गेली याचे समाधान अधिक आहे.
कुठल्याही साहित्य प्रकारामध्येच नव्हे तर कुठे ही सार्वजनिक स्थळी/वेळी, सभ्य किंवा पार्लमेंटरी शब्दच असावेत असा संकेत आहे, किंवा यालाच समाजात सभ्यपणा महणतात, यात दुमत नाही. परंतु 21व्या शतकातच नव्हे तर अगदी फार पूर्वी आम्हीच हा पायंडा मोडला आहे आणि त्या मोडक्या पायंड्याला पारितोषिकांनी सन्मानित ही केले आहे. ढसाळांच्या कवितांचा किंवा इतर दलित कवितांचा संदर्भ ईथे देता येईल. उदाहरणादाखल हल्लीच वाचनात आलेल्या कवितेच्या दोन ओळी ईथे देत आहे... स्वातंत्रया स्वातंत्रया तुझी व्याख्या मांड। नाहीतर तुझ्या *** **। हल्ली चित्रपटांमधून ऐकायला येणा-या शिव्या व 3 ईडियट सारख्या चित्रपटातील 3 ढुंगणे पाहिल्यावर, 21 शतकातील सभ्यपणा नव्याने अधोरेखीत करावा लागेल असेच वाटते. शब्दांना पर्याय जरी असले तरी भावना व्यक्त करणारा अर्थ मिळतोच असे नाही. असो, मी फक्त ह्या माध्यमातून भावना व्यक्त करीत होतो. मला कुणाला दुखवायच्ो नव्हते, मी दिलगीर आहे; मला क्षमा करा. पुढे इथे अशी चुक करणार नाही, एवढेच, धन्यवाद!