हिमालयाची निधडी छाती....

हिमालयाची निधडी छाती....
चंद्र मेघात झाकलेला, अन नदीस पूर होता
भटकल्या होडीत ’ती अन मी’ किनारा दूर होता..
ढळलेल्या सांज समयासी, खुपच लांब बगीचा तो
धोतर्याचे फ़ूल तिज दिले मी, काय कसूर होता ?
ती मला गवसलीच नाही, हृदय जळतच राहीले
बर्फ़ात लपेटले हृदया, तरी निघत धूर होता..
झेलली किती आक्रमणे, माय मराठीने माझ्या
ना डगमगली कदापि, जो तीचा शब्द शूर होता..
धडकले तेच रक्तबंबाळ झाले, युद्धखोर ते
टक्कर दिली! हा हिमालयाचा निधडा ऊर होता..
गंगाधर मुटे
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना
- हे पान ईमेलने पाठवा
गंगाधर मुटे---हिमालयाची निधडी छाती....
सद्य राजकारणावर एक गझल होउद्या.
प्रतिसाद!
आपण मला आपुलकीने म्हणालात म्हणून धाडसीपणे माझा प्रतिसाद देत आहे. हे मार्गदर्शन वगैरे नाही. फक्त मत समजून घ्यावेत.
त्यापुर्वी काही महत्वाच्या बाबी -
1. गझलेतील प्रत्येक ओळीच्या मात्रा समान असायलाच हव्यात.
2. गझल जर मात्राव्रुत्तात किंवा गणव्रुत्तातच असते.
3. मात्रा समान असुनही लयीत म्हणता आले पाहिजे. याचसाठी गणव्रुत्त वापरणे योग्य ठरते.
4.
---------------------------------------------------------------------
आपली गझल:
चंद्र मेघात झाकलेला अन, नदीस पूर होता - मात्रा 28
भटकल्या होडीत ’ती अन मी’ किनारा दूर होता - मात्रा 28
दुसरी ओळ नेमकेपणाने व्योमगंगा व्रुत्तात बसत आहे.
व्योमगंगा -
गा ल गा गा गा ल गा गा गा ल गा गा गा ल गा गा
भट क ल्या हो डी त ती अन मी,कि ना रा दू र हो ता
मात्र पहिली ओळ तशी बसत नाही. पहिली ओळ अशी होते.
चं द्र मे घा त झा क ले ला अन न दी स पू र हो ता
गा ल गा गा ल गा ल गा गा गा ल गा ल गा ल गा गा - हे व्योमगंगा होत नाही.
आता ही ओळ जर शब्द तेच ठेवून बदलायची असली तर अशी लिहिता येईल.
चं द्र मे घे झा क ला हो ता, न दी ला पू र हो ता
गा ल गा गा गा ल गा गा गा ल गा गा गा ल गा गा
मात्र यात 'मेघे' हा संस्क्रूत प्रकारचा शब्द आला. त्यामुळे थोडा वेगळा वाटू शकेल.
याच प्रमाणे खालील प्रत्येक शेर तपासता येईल.
गा चा अर्थ गुरू अक्षर, ज्याच्या मात्रा दोन होतात.
ल म्हणजे लघु अक्षर ज्याची एक मात्रा होते.
मात्रा म्हणजे अक्षर उच्चारण्यास लागणारा काळ. हा काळ जर प्रत्येक ओळीत समानच आला तर आपोआपच रचना गेय होते. त्यामुळेच सर्व गझला मुळातच गेय असतात.
मराठीमधे फक्त तीनच स्वर लघु आहेत. अ, उ व इ हे ते तीन स्वर! याशिवाय सर्व स्वर गुरू आहेत. म्हणजे, आ, ई, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अं, अ: या प्रत्येक स्वराच्या दोन मात्रा होतात. याचाच अर्थ जे अक्षर लघु स्वराचे असेल त्याची मात्र एक्: जसे, पुणे या शब्दात 'पु' या अक्षराची मात्रा एक आहे. तसेच, जे अक्षर गुरू स्वराचे आहे त्याच्या मात्रा दोन होतात. त्यामुळे पुणे मधील 'णे' च्या मात्रा दोन होतात. हाच नियम मराठीतील सर्व अक्षरांना लागू होतो.
याला जोडाक्षरांमधे मात्र अपवाद होतात. ते असे:
पद्धत - या शब्दात 'द्ध' हे जे जोडाक्षर आहे त्यातील 'ध आधी येणारा द या अक्षराचा' उच्चार अर्धवट 'प' या अक्षरात मिसळतो. यामुळे 'प' हे अक्षर मुळात लघु असूनही ते गुरू ठरते. याचे कारण अर्थातच ते अक्षर उच्चारायला लागणारा काळ हा एका एका लघु अक्षराच्या काळाहून जास्त / दुप्पट असतो.
सर्वांगीण - या शब्दामधे सुरुवातीचा 'स' जरी लघु असला तरी 'र्वा' मधील 'र' चा उच्चार त्यात मिसळल्यामुळे तो 'सर' असा होतो व त्यामुळे तो गुरू धरला जातो.
'पत्र' या शब्दातील 'प' असाच गुरू होतो.
'अक्षर' - या शब्दातील 'क्ष' खरे तर जोडाक्षर नाही. ते एक लघुच अक्षर आहे. मात्र तय अक्षराआधी जर आणखीन एक लघु अक्षर असेल तर 'क्ष' या अक्षरातील 'क-श' अशी फोड होऊन अर्धा 'क' 'अ' या सुरुवातीच्या अक्षरावर उच्चाराचा भार टाकतो. त्यामुळे 'अ' या अक्षराच्या मात्रा दोन होतात, ते गुरू अक्षर धरले जाते. मात्र 'क्षमा' हे अक्षर असेल तर 'क्ष'च्या आधी कोणतेच अक्षर नसल्यामुळे 'क्ष' हे अक्षर लघुच राहाते.
याचप्रमाणे 'प्रमाण' या शब्दातील 'प्र' हा जोडाक्षर असूनही लघुच ठरतो. मात्र 'विप्र' (ब्राह्मण) अशा शब्द घेतला तर त्यातील 'वि'च्या मात्रा दोन ठरतात. तसेच, सप्रमाण या शब्दात 'स' च्या मात्रा दोन होतात.
जोडाक्षरा आधी येणार्या लघु अक्षराचा उच्चार गुरू होतो असा हा नियम आहे. मात्र, ती दोन्ही अक्षरे एकाच शब्दातील असावीत व त्यांचा क्रम हा 'लघु अक्षरानंतर जोडाक्षर' असाच असल्यास तसे होते.
आता याही नियमाला अपवाद आहेत.
पुन्हा, गुन्हा, कट्यार असे काही शब्द असतात. यात पु. गु व क ही अक्षरे लघुच राहतात. कारण त्यांचा उच्चार अनुक्रमे 'पुन्न्हा', 'गुन्न्हा' व 'कट्ट्यार' असा न होता पुन्हा, गुन्हा, कट्यार असाच होतो.
याप्रमाणे अक्षरांच्या मात्रा मोजता आल्यानंतर दोन्ही ओळीतील लघु व गुरू अक्षरांच्या मात्रांची मांडणी समसमान करावी लागते. यातून गणव्रुत्त निर्माण होते.
जसे आपल्या मतल्यातील दुसर्या ओळीत व्योमगंगा व्रुत्त आहे. अशी हजारो व्रुत्ते आहेत. आपली आपण केली तरी चालतात. मात्र दोनच अटी:
1. प्रत्येक ओळीत (गझलेतील) सर्व लघु व गुरू अक्षरांचा क्रम समान राहिलाच पाहिजे.
2. ओळ लयीत म्हणता यायला पाहिजे.
ओळ लयीत म्हणता येण्यासाठी सुरुवातीला याच स्थळावरील जयश्री अंबासकर, वैभव जोशी, चक्रपाणि, यांच्या गझला सुरुवातीपासून आहेत. पुढच्या आठ एक पानांवर माझ्याही गझला आहेत. त्या वाचून आपल्याला लयीचे भान येईलच.
याप्रमाणे खालील सर्व ओळींच्या मात्रा मोजाव्यात व लघु व गुरू अक्षरांचा क्रम लिहावात.
-------------------------------------------------------------------
ढळलेल्या सांज समयासी, खुपच लांब बगीचा तो
धोतर्याचे फ़ूल तिला दिले मी, काय कसूर होता ?
ती मला गवसलीच नाही, हृदय जळतच राहीले
बर्फ़ात लपेटले हृदया, तरी निघत धूर होता..
झेलली किती आक्रमणे, माय मराठीने माझ्या
ना डगमगली कदापि, जो तीचा शब्द शूर होता..
धडकले ते रक्तबंबाळ झाले, युद्धखोर ते
टक्कर दिली! हा हिमालयाचा निधडा ऊर होता..
----------------------------------------------
मात्राव्रुत्तातील गझलेमधे लगु, गुरूचा क्रम समान नसतो. मात्र मात्रांची मोजणी एकूण सर्व ओळींमधे समानच भरायला पाहिजे व लयीत वाचताही यायला पाहिजे.
---------------------------------------------------------------------
आपल्याला मनापासून शुभेच्छा व धन्यवाद!
आभारी आहे.
आपुलकीने मार्गदर्शन केल्याबद्दल आभार.
ही गझल मात्रावृत्तात लिहिली असून संख्या २८ गृहित धरल्या आहेत.
आता 4 व 9 व्या ओळीत थोडा बदल केला आहे.
धन्यवाद
धन्यवाद बेफिकिरजी........आपल्या या प्रतिसादामुळे माझ्यासरख्या नवशिक्यास सुद्धा आवश्यक ते मार्गदर्शन नकळत मिळून जाते.....धन्यवाद.
डॉ.कैलास गायकवाड