फारसा वाटेत नाही आमचा वाडा

फारसा वाटेत नाही आमचा वाडा
पण तरी रुंदीकरण करताय तर पाडा
माल यालाही नकोसा आणि त्यालाही
जीवनाचा न्यायचा आता कुठे गाडा?
गप्प बसण्याने कुणाला कीव येते का?
ओरडा, भोकाड पसरा, पायही झाडा
पादचारी मार्ग नाही या मनामध्ये
फेरिवाल्यांनो इथे घालू नका राडा
घेतली तालीम ज्याची ते कुठे घडते?
पोचतो जेथे तिथे भलताच आखाडा
काय जाणे त्या जुन्या वस्तू कुठे गेल्या?
राहिला नाही अता भिंतीस कोनाडा
रक्तदाबाची जराशी चाचणी घेऊ
एकदा माझ्यासमोरी घाल अंबाडा
काव्य साकारेल माझा धूर वा माती
मारुनी जाळा मला किंवा मला गाडा
ठेवली असती तुझी जागा मनामध्ये
जन्मभर झाला तुझा प्रेमातला खाडा
'बेफिकिर' मागून घे आधार गझलेचा
आपला बदलायला आलाय सांगाडा
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना
- हे पान ईमेलने पाठवा
मस्त.
गप्प बसण्याने कुणाला कीव येते का?
ओरडा, भोकाड पसरा, पायही झाडा
हे जास्त भावले.
अप्रतिम
खुपच सुरेख गझल.
पादचारी , काय जाणे त्या जुन्या वस्तू कुठे गेल्या? ,ठेवली असती हे शेर अप्रतिम
पण
रक्तदाबाची जराशी चाचणी घेऊ
एकदा माझ्यासमोरी घाल अंबाडा
ह्या एका शेराने धमाल केली आहे.सुभानअल्लाह !!!
आपल्या गझलेचे वैशेष म्हणजे लय आणि व्रूत्त.
आपल्या सगळ्याच गझल उत्तम असतात.
आपणास भेटण्याचा योग यावा.
शुभेच्छा
आभार
दोघांचेही मनापासून आभार! संपर्कासाठी 9371080387 वर डायल करू शकताच.